पेरूमध्ये मोठा अपघात! पर्यटकांना घेऊन जाणारे विमान कोसळले; १३ जणांचा जागीच मृत्यू

Foto
पेरू : पेरूमधील नाझ्का शहराबाहेर पर्यटकांना घेऊन जाणारे विमान कोसळले आहे. ज्यात १३ जणांचा मृत्यू झाला. शनिवारी हे विमान पर्यटकांना नाझ्का लाईन्स पाहण्यासाठी घेऊन जात होते असं नाझ्का शहर प्रशासनाने म्हटले आहे. नाझ्का लाईन्स म्हणजे शेकडो वर्षांपूर्वी पेरूच्या स्थानिक लोकांनी वाळवंटात कोरलेल्या भू-चित्रांचा एक संच आहे. या रेषा प्राण्यांच्या आकृत्या तयार करतात, ज्या केवळ विमानातून किंवा मनोर्‍यातूनच पूर्णपणे पाहता येतात.
 
नाझ्का सरकारने सांगितले की, या विमानाने जवळच्या इका शहरातून उड्डाण घेतले होते. पेरूची कंपनी एरोडियानाद्वारे हे विमान चालवले जात होते. ही कंपनी गेल्या १४ वर्षांपासून सेसना ग्रँड कॅराव्हॅन विमानांचा वापर करून नाझ्का लाइन्सवर निसर्गरम्य हवाई सफरी आयोजित करत आहे. आता या अपघाताची चौकशी सुरू आहे असं पेरूच्या अधिकार्‍यांनी सांगितले. यावर तात्काळ प्रतिक्रिया मिळू शकली नाही. 

पेरूच्या एरोडियाना कंपनीचे विमान
अपघातग्रस्त विमान पेरूच्या मएरोडियानाफ या विमान कंपनीचे होते. हे विमान नाझ्का लाईन्स पाहण्यासाठी पिस्को विमानतळावरून निघाले होते, परंतु उड्डाणानंतर काही मिनिटांतच नियंत्रण कक्षाशी त्याचा संपर्क तुटला असं स्थानिक अधिकार्‍यांनी सांगितले. अद्याप या अपघाताचे कारण समजले नाही. सध्या तपास सुरू करण्यात आला आहे. सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओंमध्ये अपघातस्थळी धूर निघताना आणि विमानाचे अवशेष एका कोरड्या शेतात विखुरलेले दिसत होते. या व्हिडिओंची स्वतंत्रपणे पडताळणी करता आली नाही.

नाझ्का लाईन्स हे युनेस्कोच्या यादीत समाविष्ट
नाझ्का लाईन्स या पर्यटनस्थळाचा युनेस्काच्या यादीत समावेश असून ते पुरातत्व स्थळ आहे. तिथे वाळवंटात कोरलेल्या मोठ्या, प्राचीन भू-चित्रांचा संग्रह आहे. दरवर्षी जवळपास १ लाखाहून अधिक पर्यटक या स्थळाला भेट देतात. त्यापैकी बहुतेक जण लहान विमानांमधून प्रवास करतात. अपघाताच्या आदल्या दिवशी ताशी ४० किमी पेक्षा जास्त वेगाने वाहणार्‍या वार्‍यामुळे धूळ उडत होती आणि दृश्यमानता कमी झाली होती, त्यामुळे जवळच्या मारिया रिचे विमानतळावरून होणारी हवाई उड्डाणे रद्द करण्यात आली होती. खराब हवामानामुळे पर्यटकांना घेऊन जाणारी दोन विमाने मार्कोना विमानतळाकडे वळवण्यात आली होती.